Sunday, October 31, 2021

चाळीतली दिवाळी🪔🎉*

*चाळीतली दिवाळी🪔🎉*

वयाची बरीच वर्ष चाळीतच गेली. आता आम्ही फ्लॅटमध्ये कोंडलेल्या अवस्थेत राहतो. कोणताही सण असू दे, सर्वांचे दरवाजे बंद म्हणजे बंद. एकाच्या घरात काय चाललंय ते बाजूच्या फ्लॅटवाल्यांंनाही समजत नाही, इतकी प्रायव्हसी जपली जाते. 
असो. 

तर, चाळीची मज्जाच और होती. एका मजल्यावर ५० खोल्या, तिन मजल्यांची चाळ. मागे २५ खोल्या आणि पुढे २५ खोल्या मध्ये दरवाजा. आणि सर्वांना एकच सामायिक (common) गॅलरी. पंचवीस ही खोल्यांचे दरवाजे एकाच दिशेला उघडायचे. सकाळी सूर्य उगवायच्या आधीच सगळ्यांचे दरवाजे उघडायचे ते रात्री अकरा बारा वाजताच बंद व्हायचे. स्त्री वर्गापैकी कोणीही कोणाच्याही घरात बिनदिक्कत ये-जा करायचं. एका शेजारच्या घरातील वस्तू, पदार्थ, जिन्नस या घरातून त्या घरात बिनदिक्कत फिरायचे. कसलाही विधिनिषेध किंवा औपचारिकपणा नव्हता. बऱ्यापैकी एकोपा जपून होती सर्व कुटूंबं. म्हणजे कोणाची भांडणं व्हायची नाहीत अशातला प्रकार नव्हता, परंतु अशी भांडणं फार दिवस टिकायची नाहीत. आमच्या चाळीत सर्व सण अगदी धूमधडाक्यात साजरे व्हायचे. आणि दिवाळी म्हणजे तर आठ दिवस अक्षरशः चंगळजत्रा असायची. 

शाळेची सहामाही परीक्षा संपलेली असायची. आमच्या आईला मोठे ॲल्युमिनियमचे डबे भरुन भरून दिवाळीचे सर्व पदार्थ करायची भारी हौस होती. दिवाळीच्या आठ-दहा दिवस आधीपासूनच आमच्या आईची वेगवेगळी पिठे, मसाले, रवा, मैदा, तेल, तूप, डालडा इत्यादी पदार्थांबरोबर घनघोर लढाई चालू असायची. बेसन, रवा, मैदा निवडणे चाळणे, अशी काम चालू व्हायची. आमच्या मजल्यावरील इतर घरातून मुली आणि बायका येऊन करंज्या लाटायच्या. शंकरपाळ्या कापून त्या भाजून द्यायच्या. बेसनचे, रव्याचे लाडू वळून द्यायच्या. साच्यातून शेव आणि चकल्या काढणे, तेलात भाजणे वगैरे सर्व प्रकार दुपारच्या जेवणानंतर चालू व्हायचे ते अगदी अंधार पडेपर्यंत चालू असायचे. अगदी दिवाळीच्या दिवसापर्यंत प्रत्येकाच्या घरात आलटून-पालटून हाच कार्यक्रम असायचा. सर्वांच्या घरात दणकावून दिवाळीचे पदार्थ बनवले जायचे. या सर्व पदार्थांना पुणे, नाशिक, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा वेगवेगळ्या चवी असायच्या. प्रत्येक घरातले पदार्थ चवीला वेगवेगळे लागायचे. 

तोपर्यंत पुरुष मंडळी घराला रंग काढणे, कंदील बनवणे, कंदील लावणे, तोरणे लावणे अशा कामांना हातभार लावायचे. त्याच दरम्यान नवीन कपडे, रांगोळी, उटणे, कारेटी वगैरे घरात यायची. आणि मग आतुरता असायची दिवाळीच्या पहिल्या अभ्यंगस्नानाची. 

दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या दिवशी सर्वात आधी उठून चाळीच्या खाली येऊन कोण फटाके लावतो ह्याची स्पर्धा असायची. दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या दिवशी पहाटे तीन-चार वाजताच कोणीतरी रशीबार पेटवायचं. त्यावेळी चौकोनी खोक्यातला कॅप्टन नावाचा मोठा बार मिळायचा आणि हिरव्या सुतळीचा रशीबार मिळायचा. 

#धड्डड्डम्म्म्म् करून मोठा आवाज व्हायचा आणि आमची चाळ अर्धवट झोपेतून जागी व्हायची. यात आमच्या चाळीत आसोलकर काका मोठ्याने दिन दिन दिवाळी असं ओरडत त्यामुळे सुद्धा लोकांना जाग येई. या फटाक्यांच्या आवाजाच्या आधीच आमच्या मातोश्री उठलेल्या असायच्या. मग आमची लगबग चालू व्हायची. घाई असायची खाली जाऊन इतर मुलांबरोबर फटाके उडवण्याची. आईने उटणे तयार करून मोरी मध्ये ठेवलेलं असायचं. पटापट दात घासायचे आणि मोरी मध्ये जाऊन आंघोळ करायची यासाठी घाई गडबड व्हायची. मोती साबण वगैरे असली काही थेरं त्यावेळी नव्हती. पण आंघोळीसाठी साबणाची नवीन वडी मिळायची. मग आधी अंगाला उटणं लावायचा, मग साबण लावायचं आणि भसाभसा अंगावर पाणी ओतून घ्यायचो. की झाली आमची पहिली आंघोळ. 

दरवाजाच्या बाहेर उंबऱ्याच्या बाजूला कारेटं चिरडलं की दिवाळीला सुरुवात व्हायची. पुन्हा घरात येऊन फटाके निवडणे, मोठ्या माळा सोडवणं असा प्रकार असायचा. लवंगी ची माळही सोडून एक एक लवंगी वेगळी करायचो. ताजमहालची लाल फटाक्यांची माळ सोडवायची आणि एकेक लाल फटाकडी वेगळी करायची. लक्ष्मी बारचं एक पाकीट सोडून पाच लक्ष्मी बार वेगवेगळे करायचे. असेच पाच-दहा चिमणी बार सुट्टे करायचे. आणि मग हे सर्व फटाके, एक माचीस आणि एक-दोन उदबत्या प्लास्टिकच्या पिशवीत भरून चाळीच्या खाली यायचं. गॅलरीतून डोकावून एक-दुसऱ्याला पाहून भरभर सर्व मुलं आपापले फटाके घेऊन चाळीच्या खाली यायचे. आणि मग दीड-दोन तास अखंड फटाक्यांचा कडकडाट चालू राहायचा. मध्येच कोणीतरी कानाचे पडदे हलवणारा रशीबार लावायचा. तोपर्यंत लख्खं उजाडलेला असायचं. हाताला फटाक्यांच्या पावडरचा चंदेरी  चढलेला असायचा. मग पुन्हा घरात एंट्री मारायची, हात पाय धुवायचे आणि चहा नाश्ता करायला बसायचं. आठवडाभर दिवाळीच्या पदार्थांचा वास नाकात बसलेला असायचा. त्यामुळे दिवाळीचे पदार्थ खायची इच्छा व्हायची नाही. अगदीच नाइलाज म्हणून दोन-तीन चकल्या कुस्करून चहात बुडवून खायच्या हेच ऐकक आवडीचं खाणं होतं. दिवाळीला मिठाई वगैरे प्रकार त्यावेळी फारसे प्रचलित नव्हते. किंवा आम्हाला तेंव्हा कोणी मिठाई देत नव्हतं असं देखील असू शकेल. सकाळी साधारण नऊ दहा वाजता संपूर्ण चाळ लखलखीत सजलेली असायची. सर्वांच्या दरवाजात मुली आणि बायका रांगोळी घालत असायच्या. लाडू करंज्या शंकरपाळे शेव चकली चिवडा अनारसे इत्यादी पदार्थांनी भरलेली ताटं या घरातून त्या घरात पोचती केली जायची. या देवाण-घेवाणीतच दिवस मावळतीला लागायचा. 

संध्याकाळ होताच कंदील, दिवे, आणि रंगीबेरंगी तोरणांनी आमची चाळ उजळून निघायची. एखाद दुसरा कंदील वेगळा असायचा, नाही तर आमच्या चाळीमध्ये एकाच प्रकारचे कंदील आणले जायचे. दिवाळीच्या दिवसात आमच्या चाळीतील दिव्यांचा लखलखाट मन वेधून घेतो. इतकं सुंदर दिवाळीच दृश्य असतं आमच्या चाळीचं. 

सायंकाळी गॅलरीमध्ये पुन्हा मुली आणि बायका नव्याने रांगोळी काढायला बसायच्या. विविधरंगी दिव्यांनी आणि कंदिलांंच्या उजेडात आमची गॅलरी आणि संपूर्ण चाळ उजळून निघालेली असायची. अंधार पडल्यानंतर पुन्हा एकदा चाळीच्या खाली आमच्या मुलांत फटाके उडवण्याची स्पर्धा लागायची. अभ्यंगस्नान, पहिली आंघोळ, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा, भाऊबीज या सर्व दिवसात दिवसभराचा कमी-अधिक प्रमाणात हाच कार्यक्रम असायचा. आमच्या घरात पाहुण्या-रावळ्यांची अखंड ये-जा असायची. आमच्या संपूर्ण एरियात, सर्वच चाळींमध्ये अशीच दणदणीत दिवाळी साजरी व्हायची. प्रत्येकाच्या घरातून दिवाळीचा आनंद आणि उत्साह अगदी ओसंडून वाहत असायचा. दिवाळीचा हा आनंद आठ-दहा दिवस अखंड ज्योतीप्रमाणे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर लखलखत असायचा. दिवाळी दिवाळी म्हणून जी म्हणतात ती या आमच्या चाळ संस्कृतीत आनंदात आणि उत्साहात साजरी केली जायची. 

घरात वडील एकटे कमावणारे होते. आणि त्या एकट्या माणसाच्या कमाईत आम्ही दणदणीत दिवाळी साजरी करायचो. त्यावेळी दिवाळीतल्या आनंदाला पारावार नसायचा. आजही आम्ही चाळीतील दिवाळीच्या आठवणीत सहज रममाण होतो. कारण... 

...आता आमच्या दिवाळीच्या आनंदाला ती अज्ञानाची आणि निरागसतेची सोनेरी किनार नाहीये. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेण्यासाठी जो बाळबोध मेंदू लागतो तो आता दुनियादारी मुळे बथ्थड झालेला आहे. फटाक्यांच्या मोठाल्या आवाजामुळे आता कानाला त्रास होतो. दिवाळीचे पदार्थ बनविण्यासाठी आता वेळही नाही आणि खाण्याची फारशी इच्छाही नाही. Adulteration च्या भीतीने आता मिठाई खात नाही. पूर्वी मी छान रांगोळी चित्र काढायचो. पाठदुखी मुळे आता जमिनीवर बसून रांगोळी काढणं कठीण झालंय. नवीन कपड्यांचं अप्रूप राहिलं नाहीये. आता फक्त मला दिवाळीतील दिव्यांची रोषणाई आणि लखलखाट आवडतो. 

बंदिस्त फ्लॅटमध्ये शांतपणे बसून राहणं हेच आता दिवाळीतलं काम. डोक्यात वेगवेगळे विचार येत राहतात, आणि मग हमखास आठवते ती आणि आम्ही लहानपणी साजरी केलेली चाळीतली दिवाळी. 

*अक्षरशः दिवाळीचे दिवस होते ते...*

No comments:

Post a Comment