Sunday, October 31, 2021

चाळीतली दिवाळी🪔🎉*

*चाळीतली दिवाळी🪔🎉*

वयाची बरीच वर्ष चाळीतच गेली. आता आम्ही फ्लॅटमध्ये कोंडलेल्या अवस्थेत राहतो. कोणताही सण असू दे, सर्वांचे दरवाजे बंद म्हणजे बंद. एकाच्या घरात काय चाललंय ते बाजूच्या फ्लॅटवाल्यांंनाही समजत नाही, इतकी प्रायव्हसी जपली जाते. 
असो. 

तर, चाळीची मज्जाच और होती. एका मजल्यावर ५० खोल्या, तिन मजल्यांची चाळ. मागे २५ खोल्या आणि पुढे २५ खोल्या मध्ये दरवाजा. आणि सर्वांना एकच सामायिक (common) गॅलरी. पंचवीस ही खोल्यांचे दरवाजे एकाच दिशेला उघडायचे. सकाळी सूर्य उगवायच्या आधीच सगळ्यांचे दरवाजे उघडायचे ते रात्री अकरा बारा वाजताच बंद व्हायचे. स्त्री वर्गापैकी कोणीही कोणाच्याही घरात बिनदिक्कत ये-जा करायचं. एका शेजारच्या घरातील वस्तू, पदार्थ, जिन्नस या घरातून त्या घरात बिनदिक्कत फिरायचे. कसलाही विधिनिषेध किंवा औपचारिकपणा नव्हता. बऱ्यापैकी एकोपा जपून होती सर्व कुटूंबं. म्हणजे कोणाची भांडणं व्हायची नाहीत अशातला प्रकार नव्हता, परंतु अशी भांडणं फार दिवस टिकायची नाहीत. आमच्या चाळीत सर्व सण अगदी धूमधडाक्यात साजरे व्हायचे. आणि दिवाळी म्हणजे तर आठ दिवस अक्षरशः चंगळजत्रा असायची. 

शाळेची सहामाही परीक्षा संपलेली असायची. आमच्या आईला मोठे ॲल्युमिनियमचे डबे भरुन भरून दिवाळीचे सर्व पदार्थ करायची भारी हौस होती. दिवाळीच्या आठ-दहा दिवस आधीपासूनच आमच्या आईची वेगवेगळी पिठे, मसाले, रवा, मैदा, तेल, तूप, डालडा इत्यादी पदार्थांबरोबर घनघोर लढाई चालू असायची. बेसन, रवा, मैदा निवडणे चाळणे, अशी काम चालू व्हायची. आमच्या मजल्यावरील इतर घरातून मुली आणि बायका येऊन करंज्या लाटायच्या. शंकरपाळ्या कापून त्या भाजून द्यायच्या. बेसनचे, रव्याचे लाडू वळून द्यायच्या. साच्यातून शेव आणि चकल्या काढणे, तेलात भाजणे वगैरे सर्व प्रकार दुपारच्या जेवणानंतर चालू व्हायचे ते अगदी अंधार पडेपर्यंत चालू असायचे. अगदी दिवाळीच्या दिवसापर्यंत प्रत्येकाच्या घरात आलटून-पालटून हाच कार्यक्रम असायचा. सर्वांच्या घरात दणकावून दिवाळीचे पदार्थ बनवले जायचे. या सर्व पदार्थांना पुणे, नाशिक, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा वेगवेगळ्या चवी असायच्या. प्रत्येक घरातले पदार्थ चवीला वेगवेगळे लागायचे. 

तोपर्यंत पुरुष मंडळी घराला रंग काढणे, कंदील बनवणे, कंदील लावणे, तोरणे लावणे अशा कामांना हातभार लावायचे. त्याच दरम्यान नवीन कपडे, रांगोळी, उटणे, कारेटी वगैरे घरात यायची. आणि मग आतुरता असायची दिवाळीच्या पहिल्या अभ्यंगस्नानाची. 

दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या दिवशी सर्वात आधी उठून चाळीच्या खाली येऊन कोण फटाके लावतो ह्याची स्पर्धा असायची. दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या दिवशी पहाटे तीन-चार वाजताच कोणीतरी रशीबार पेटवायचं. त्यावेळी चौकोनी खोक्यातला कॅप्टन नावाचा मोठा बार मिळायचा आणि हिरव्या सुतळीचा रशीबार मिळायचा. 

#धड्डड्डम्म्म्म् करून मोठा आवाज व्हायचा आणि आमची चाळ अर्धवट झोपेतून जागी व्हायची. यात आमच्या चाळीत आसोलकर काका मोठ्याने दिन दिन दिवाळी असं ओरडत त्यामुळे सुद्धा लोकांना जाग येई. या फटाक्यांच्या आवाजाच्या आधीच आमच्या मातोश्री उठलेल्या असायच्या. मग आमची लगबग चालू व्हायची. घाई असायची खाली जाऊन इतर मुलांबरोबर फटाके उडवण्याची. आईने उटणे तयार करून मोरी मध्ये ठेवलेलं असायचं. पटापट दात घासायचे आणि मोरी मध्ये जाऊन आंघोळ करायची यासाठी घाई गडबड व्हायची. मोती साबण वगैरे असली काही थेरं त्यावेळी नव्हती. पण आंघोळीसाठी साबणाची नवीन वडी मिळायची. मग आधी अंगाला उटणं लावायचा, मग साबण लावायचं आणि भसाभसा अंगावर पाणी ओतून घ्यायचो. की झाली आमची पहिली आंघोळ. 

दरवाजाच्या बाहेर उंबऱ्याच्या बाजूला कारेटं चिरडलं की दिवाळीला सुरुवात व्हायची. पुन्हा घरात येऊन फटाके निवडणे, मोठ्या माळा सोडवणं असा प्रकार असायचा. लवंगी ची माळही सोडून एक एक लवंगी वेगळी करायचो. ताजमहालची लाल फटाक्यांची माळ सोडवायची आणि एकेक लाल फटाकडी वेगळी करायची. लक्ष्मी बारचं एक पाकीट सोडून पाच लक्ष्मी बार वेगवेगळे करायचे. असेच पाच-दहा चिमणी बार सुट्टे करायचे. आणि मग हे सर्व फटाके, एक माचीस आणि एक-दोन उदबत्या प्लास्टिकच्या पिशवीत भरून चाळीच्या खाली यायचं. गॅलरीतून डोकावून एक-दुसऱ्याला पाहून भरभर सर्व मुलं आपापले फटाके घेऊन चाळीच्या खाली यायचे. आणि मग दीड-दोन तास अखंड फटाक्यांचा कडकडाट चालू राहायचा. मध्येच कोणीतरी कानाचे पडदे हलवणारा रशीबार लावायचा. तोपर्यंत लख्खं उजाडलेला असायचं. हाताला फटाक्यांच्या पावडरचा चंदेरी  चढलेला असायचा. मग पुन्हा घरात एंट्री मारायची, हात पाय धुवायचे आणि चहा नाश्ता करायला बसायचं. आठवडाभर दिवाळीच्या पदार्थांचा वास नाकात बसलेला असायचा. त्यामुळे दिवाळीचे पदार्थ खायची इच्छा व्हायची नाही. अगदीच नाइलाज म्हणून दोन-तीन चकल्या कुस्करून चहात बुडवून खायच्या हेच ऐकक आवडीचं खाणं होतं. दिवाळीला मिठाई वगैरे प्रकार त्यावेळी फारसे प्रचलित नव्हते. किंवा आम्हाला तेंव्हा कोणी मिठाई देत नव्हतं असं देखील असू शकेल. सकाळी साधारण नऊ दहा वाजता संपूर्ण चाळ लखलखीत सजलेली असायची. सर्वांच्या दरवाजात मुली आणि बायका रांगोळी घालत असायच्या. लाडू करंज्या शंकरपाळे शेव चकली चिवडा अनारसे इत्यादी पदार्थांनी भरलेली ताटं या घरातून त्या घरात पोचती केली जायची. या देवाण-घेवाणीतच दिवस मावळतीला लागायचा. 

संध्याकाळ होताच कंदील, दिवे, आणि रंगीबेरंगी तोरणांनी आमची चाळ उजळून निघायची. एखाद दुसरा कंदील वेगळा असायचा, नाही तर आमच्या चाळीमध्ये एकाच प्रकारचे कंदील आणले जायचे. दिवाळीच्या दिवसात आमच्या चाळीतील दिव्यांचा लखलखाट मन वेधून घेतो. इतकं सुंदर दिवाळीच दृश्य असतं आमच्या चाळीचं. 

सायंकाळी गॅलरीमध्ये पुन्हा मुली आणि बायका नव्याने रांगोळी काढायला बसायच्या. विविधरंगी दिव्यांनी आणि कंदिलांंच्या उजेडात आमची गॅलरी आणि संपूर्ण चाळ उजळून निघालेली असायची. अंधार पडल्यानंतर पुन्हा एकदा चाळीच्या खाली आमच्या मुलांत फटाके उडवण्याची स्पर्धा लागायची. अभ्यंगस्नान, पहिली आंघोळ, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा, भाऊबीज या सर्व दिवसात दिवसभराचा कमी-अधिक प्रमाणात हाच कार्यक्रम असायचा. आमच्या घरात पाहुण्या-रावळ्यांची अखंड ये-जा असायची. आमच्या संपूर्ण एरियात, सर्वच चाळींमध्ये अशीच दणदणीत दिवाळी साजरी व्हायची. प्रत्येकाच्या घरातून दिवाळीचा आनंद आणि उत्साह अगदी ओसंडून वाहत असायचा. दिवाळीचा हा आनंद आठ-दहा दिवस अखंड ज्योतीप्रमाणे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर लखलखत असायचा. दिवाळी दिवाळी म्हणून जी म्हणतात ती या आमच्या चाळ संस्कृतीत आनंदात आणि उत्साहात साजरी केली जायची. 

घरात वडील एकटे कमावणारे होते. आणि त्या एकट्या माणसाच्या कमाईत आम्ही दणदणीत दिवाळी साजरी करायचो. त्यावेळी दिवाळीतल्या आनंदाला पारावार नसायचा. आजही आम्ही चाळीतील दिवाळीच्या आठवणीत सहज रममाण होतो. कारण... 

...आता आमच्या दिवाळीच्या आनंदाला ती अज्ञानाची आणि निरागसतेची सोनेरी किनार नाहीये. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेण्यासाठी जो बाळबोध मेंदू लागतो तो आता दुनियादारी मुळे बथ्थड झालेला आहे. फटाक्यांच्या मोठाल्या आवाजामुळे आता कानाला त्रास होतो. दिवाळीचे पदार्थ बनविण्यासाठी आता वेळही नाही आणि खाण्याची फारशी इच्छाही नाही. Adulteration च्या भीतीने आता मिठाई खात नाही. पूर्वी मी छान रांगोळी चित्र काढायचो. पाठदुखी मुळे आता जमिनीवर बसून रांगोळी काढणं कठीण झालंय. नवीन कपड्यांचं अप्रूप राहिलं नाहीये. आता फक्त मला दिवाळीतील दिव्यांची रोषणाई आणि लखलखाट आवडतो. 

बंदिस्त फ्लॅटमध्ये शांतपणे बसून राहणं हेच आता दिवाळीतलं काम. डोक्यात वेगवेगळे विचार येत राहतात, आणि मग हमखास आठवते ती आणि आम्ही लहानपणी साजरी केलेली चाळीतली दिवाळी. 

*अक्षरशः दिवाळीचे दिवस होते ते...*

Sunday, February 17, 2019

मैत्री

नेहा आणि प्रतीक ची ओळख नेहाच्या एका मैत्रिणी मुळे झाली होती  !  एका कार्यक्रमात दोघे भेटले होते .तिथे ही दोघांमध्ये खूप गप्पा झाल्या आणि तिथेच  आपापल्या फोन नंबर ची देवाण घेवाण झाली .
     प्रतीक शी बोलयला तिला खूप आवडायच ! Whatsapp वर msg , कॉल रोज अगदी न चुकता ! तो ही तिला कधीकधी ए रडकी , ए खडूस काही ही म्हणायचां . तिला ही आवडायचं त्याने तस म्हटलेलं ! तिचा स्वभाव च तसा होता , खूप हळवा आणि संवेदनशील ! आनंद झाला तरी डोळे भरून यायचे , कोणी तिच्या कडून दुखावलं तरी डोळे भरून यायचे !
   पण तितकीच कणखर ही होती . स्वतःवर , स्वतःच्या निर्णयावर तिचा विश्वास होता ! बोलण्यात एक धार होती , चाणाक्ष नजर होती ! स्पष्टवक्तेपणा हा तिचा गुण म्हणावा की दुर्गुण ? पण त्या मुळे कधी कोणी दुखावलं जायचं तर कधी त्याच कौतुक होऊन तीच वागणं बरोबर आहे अशी पावती मिळायची !
   त्याला हाच तिचा गुण जास्त आवडायचा ! जे काय असेल ते स्पष्ट आणि मनमोकळं बोलणं! राग आला तर राग ही व्यक्त करायची . त्याच्याबद्दल  काही वाटलं तर ती भावना ही मोठ्या मनाने व्यक्त करायची ! कधी वाद घालून , भांडून ही ती तीच म्हणणं मांडायची आणि त्याला पटवायची ! पण  बोलताना त्याने किंवा तिने गैरशब्दाचा वापर कधीही केला नाही . अस वागून प्रत्येकवेळी ती त्याच्या वरचा हक्क च दाखवायची. हेच तीच वागण त्याला आवडायचं आणि म्हणूनच तो ही  तिच्या जवळ येत गेला !
     त्या दोघांमध्ये ओढ होती कुठली अस नव्हतच !दोघे ही matured होते , समंजस होते , स्वतःच बरवाईट कळणारे होते !  तिचा स्वभाव थोडा हट्टी आणि जिद्दी होता आणि त्याचा शांत , संयमी ! विरुद्ध स्वभाव पण तरीही दोघांचं छान जमायचं .एकमेकांशिवाय , एकमेकांना बोलल्या शिवाय करमायच नाही !
       ते दोघे एकमेकांत गुंतले होते ही आणि नव्हते ही ! आपापली space  जपुनच त्यांचं वागणं होत !
         पण तिथे त्यांच्यात प्रेम हा विषय कधीच नव्हता आणि तस बोलणं ही नसायचं !
       प्रतीक च्या आयुष्यात अश्यातच  अजून एक मुलगी आली " तन्वी"  ! त्याच्या च ऑफिस मध्ये नवीनच जॉईन झाली होती . दिसायला  नेहा पेक्षा उजवी नव्हतीच पण हुशार होती नेहा पेक्षा  स्मार्ट होती ! तीच बोलणं , वागणं  प्रतीक ला तिच्या कडे आकृष्ट करत होत .तिच्या बद्दलच्या त्याच्या भावना नेहा पेक्षा खूप वेगळ्या होत्या हे त्याला जाणवायला लागलं होत . कारण तो आजकाल नेहा पेक्षा तन्वी ला जास्त वेळ देत होता ! त्यालाही मनातून हे जाणवायचं की आपण आजकाल नेहाशी पहिल्या सारख बोलत नाही , कॉल नाही , msg करत नाही !  आणि तीही बिचारी काही न बोलता समजून घेते ! पण हे किती दिवस चालणार ? त्याला स्वतःलाच वाटलं , आपण नेहा पासून लांब जातोय , तिला टाळतोय ! तन्वी मध्ये जास्त गुरफटलो आहोत !
       प्रतीक ची अवस्था इकडे आड तिकडे विहीर झाली होती ! त्याला एक मैत्रीण म्हणून नेहा हवी होती आणि प्रेयसी म्हणून तन्वी !  काय करावं नेहाशी कस बोलू काय सांगू तिला ?  तिला तन्वी बद्दल सांगू का ? तिला काय वाटेल ? तिने आपल्या बद्दल काय विचार केला असेल?  ह्या आणि अश्या बरयाच प्रश्नांनी प्रतीक ला सैरभैर केलं होतं ! पण निर्णय घ्यायचा होता आणि तो नेहाला लवकर  सांगण गरजेचं होतं !
        नेहाला ही आजकाल प्रतीकच्या वागण्यातला बदल जाणवत होता ! पण तो स्वताःउन काही सांगत नव्हता म्हणून तिला ही वाटलं कुठल्या कामात bussy असेल म्हणून जास्त बोलत नसेल ! पण तिला त्याची इतकी सवय झाली होती की त्याला कुठलं काही सांगितलं नाही तर तिला चैन पडायची नाही आणि आजकाल तर त्याच बोलणं , कॉल , msg सगळं च कमी झालं होतं !
       नेहा ला ही जाणवलं होत आपण प्रतीक मध्ये  गुंतलो आहोत . हेच का प्रेम ? ह्यालाच म्हणतात का प्रेम ? स्वतःलाच तिने विचारल आणि लाजली !
     आज ती आरश्या समोर उभी राहून हेच ठरवत होती . प्रतीक ला आज आपण  propose डे च निमित्त साधून  propose करू ! मनातल्या मनात ति आपल्याच  ह्या घेतलेल्या निर्णयावर  खूप आनंदली आणि सुखावली होती !
    आज प्रतीक ने ही ठरवलं होतं  त्याच्या मनातलं नेहाला सांगावं . त्यासाठी तिला कॉल करून आज तो तिला भेटायला बोलावणार होता ! विचार करत च होता की तिकडून नेहाचा कॉल आला ! काय रे किती दिवस झाले तुझा कॉल नाही , कधी तरी gm , gn चा msg करतोस ! आजकाल आठवण येत नाही वाटत मैत्रिणीची ! कोणी दुसरी भेटली की काय अस मुद्दाम बोलून त्याला बोलत करत होती !
       प्रतीक क्षणभर गोंधळला , त्याला वाटलं खरंच नेहाला काही कळलं तर नसेल न माझ्या आणि तन्वी बद्दल ? पण माझ्या शिवाय तिला सांगणार कोण ? स्वतःशीच पुटपुटला ! तिकडून नेहा विचारत होती  , अरे मी काय विचारते प्रतीक ? कुठे लक्ष आहे तुझं ?
नाही ग अस काही नाही , ऑफिस मधून msg आला होता तो चेक करत होतो अस म्हणून वेळ मारून नेली त्याने ! नेहा मला तुला काही संगायच आहे !आपण आज भेटायचं का ?  अरे वा प्रतीक मी पण हेच म्हणार होते ! बघ आपले विचार किती जुळतात न ,अस म्हणून हसली आणि त्याला विचरलं बोल कुठे भेटायचं सांग ?
आपल्या नेहमीच्या च ठिकाणी भेटू ग!  छान डिनर घेऊ , चालेल न तुला नेहा . हो रे चालेल त्यात काय , ह्या आधी ही आपण बरेच वेळा गेलोय की ! तर चल मग मी 7 वाजता त्या रोजच्या table च आपलं बुकिंग करून ठेवते ! नको नको आज तू नको मी करतो , आज माझ्या कडून पार्टी ! ओके प्रतीक भेटू मग , चल बाय !
            इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या .बरेच दिवस न भेटल्या मूळे नेहाचा राग साहजिक होता ! पण आज प्रतीक कडे त्याला उत्तर नव्हतं ! तो शांत च होता !
काय झालं प्रतीक ? आज बोलत का नाहीस ? त्याला काय आणि कसं सांगावं कळत नव्हतं !
काही नाही ग नेहा ,कामाचा व्याप वाढलाय आणि त्याच टेन्शन आहे ! कशी तरी वेळ मारून नेली प्रतीक ने .पण हे सांगताना त्याने नेहा कडे अजिबात बघितलं नाही ! त्याची हिम्मतच होत नव्हती तिच्या कडे बघून बोलयची !
      प्रतीक मला तुला काहि तरी सांगायचंय !
बोल न नेहा , मला ही तुला सांगायचंय , पण आधी तू सांग !
      अगदी पहिल्यांदा त्याच्याशी बोलत असल्या सारख त्याची नजर चुकवत थोडं लाजत नेहाने तिच्या मनातलं सगळं सांगितलं ! प्रतीक ऐकतोस न !अस तिने म्हटल्यावर तो भानावर आला ! त्याला काय बोलावं सुचेना . आपलं आणि तन्वीच हिला सांगितलं तर ही कशी react होईल याची त्याला भीती वाटत होती ! मनाशीच पुटपुटला , किती उशीर केलास नेहा , लवकर का नाही सांगितलंस ?
           नेहा ने ओळखलं ह्याच्या मनात नक्कीच दुसरी कोणी तरी असणार ! म्हणूनच ह्याला आता आपल्याला कस सांगावं अस वाटत असेल ?
 काही बोललास का प्रतीक ?
 काही नाही ग कुठं काय  !
         नेहा  खुर्चीवरून उठली आणि त्याच्या जवळ गेली . हळूच त्याच्या केसातून हात फिरवला आणि विचारलं कोण आहे ती प्रतीक ? 
    हे वाक्य ऐकून प्रतीक चे डोळे भरून आले .नेहा कस ओळ्खलस तू ?  अरे वेड्या मी तुला 4 वर्ष झाले ओळखते ! तुझ्या मनात काय आहे ? तू का शांत आहेस? हे मी तुझ्या नुसत्या msg मधून ही बरेच वेळा मी ओळखलं आहे , तू सांगितलं नाहीस तरी ते जाणवायचं मला . तुही म्हणायचास कस काय ओळ्खतेस ग तू नुसत्या माझ्या msg मधून ? पण प्रत्येक वाक्यातून तुझ्या मनातल माझ्या पर्यंत पोचायचं !
       पण वेड्या आज माझ्याकडे  पर्याय नव्हता . तुझ्या कडून हे काढून घेण्याशिवाय .म्हणून आज तुला इथे बोलावून विचारावं वाटलं आणि माझी शँका खरी निघाली ! अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस , मला अजिबात राग आलेला नाही किंवा वाईट ही वाटलेलं नाही .उलट आनंद च झाला तू कोणाच्या तरी प्रेमात पडलास!
      चेहऱ्यावर खोटं हसू आणि पाणावलेल्या डोळ्यांनी त्याला म्हणाली  अरे वेड्या ,  मला वाटलं माझ्या सारख्या जिद्दी आणि हट्टी मुलीच्या प्रेमात पडतोस की काय ?
अस म्हटल्यावर प्रतीक ला ही संकोचल्या सारख वाटलं ही मुद्दाम तर अस म्हणत नसेल न अशी शंका आली त्याला ही ! काही काय ग नेहा , तू खूप छान आहेस! कोणी ही तुझ्याही प्रेमात पडेल ! अस म्हणून प्रतीक थोडं वर वर हसला , पण तेच वाक्य पकडत  नेहा त्याला  म्हणाली , मग तूच का नाही पडलास प्रतीक ? अस म्हणून जोरात हसायला लागली ! पण ते हसणं नसून आतून रडणं होत ! प्रतीक ला ते जाणवलं पण तो काहि बोलला नाही !
  नेहा डोळे पुसत जागे वर येऊन बसली आणि म्हणाली , प्रतीक आत्ता  मी जे  तुला माझ्या मनातले ,तुझ्या विषयी जे  सांगितलं ते खोटं होत रे ! मला तुझ्या मनातलं काढून घ्यायचं होत म्हणून तस सांगावं लागलं ! हे सांगताना नेहाचा आवाज खूप गदगदला होता , प्रतीक ला ही ते जाणवलं पण तो काही बोलला नाही !  नेहाला ही वाटलं होतं एकदा शेवट च प्रतीक ने तिला जवळ घ्यावं आणि सॉरी म्हणावं !
       दोघानी  कसे तरी थोडं थोडं खाऊन घेतलं आणि उठले .चल रे प्रतीक , मी निघते अस म्हणून नेहाने बाजूच्या खुर्ची वरची पर्स उचलली आणि चालायला लागली !

   अग थांब न , नेहा चल मी तुला सोडतो घरी ! बराच उशीर झालाय !
 
     नको प्रतीक जाईन मी ! आता सवय करावी लागेल मला एकटीला जायची ! इतकच कसबस  बोलली आणि
 त्याच्या कडे न पाहताच डोळे पुसत त्याला बाय केला.

        थोडं पुढे गेली पण तिलाच राहवलं नाही परत मागे फिरली आणि प्रतीक sss म्हणून त्याच्या गळ्यात पडून रडली ! प्रतिक फक्त निश्चल उभा होता.......
    तो ही मनातल्या मनात तिला सॉरी म्हणत होता ......

                                                                                                                          आरती 🖋....

Monday, February 4, 2019

ओढणी


ट्रेनची चौथी सीट पकडून प्रवास केल्यावर चेहऱ्यावर 'एक गड' जिंकून 'एक योद्धा' आल्याच्याअविर्भावात मी चाळीत प्रवेश केला....चाळीच्या दाराशी लोकांची गर्दी दिसली."मी 'चौथ्या सीटची लढाई' जिंकली हि खबर चाळीत पण पोहोचली कि काय?".हे लोक माझी आता आरती ओवाळणार..."यावे यावे राजे....आप आई बहार आई....."पण मी चाळीत प्रवेश केला तरीही कुणी ढुंकूनही पाहिले नाही माझ्याकडे....मग मात्र मला थोडा संशयचआला....आम्हा चाळीतल्या लोकांना जरा सवयच असते गर्दी करायची.'स्वत:च्या घरात काय चालू आहे' या ज्ञानाबरोबर 'इतर शेजारांच्या घरात काय चालू आहे' हे माहित असणं आमच्यासाठीअतिमहत्त्वाचं असतं...जसे ते तसा मी...मग मी हि मागच्या एकाला हळूच कानात विचारले,"काय झालं रे मंग्या? अन्याच्या घरात काही झालंय काय? कुणी गचकला कि काय?"...मी अशीच मस्करीकेली."गचकला नाही....गचकावला...अन्याने स्वत:च्या बायकोला गळा घोटून मारले"...ऐकल्याच क्षणी माझा हात माझ्याच गळ्याशी गेला....थोडा भूकंप झाल्यासारखे वाटले...योद्धा थोडा हडबडला होता....अनिकेत अशी काही हरकत करेल हे माझ्याच काय तर इतर कुणाच्या हि बुद्धीला पटणारे नव्हते.कारण अनिकेत म्हणजे तसा सुजाण माणूस होता.सगळ्यांत मिळून मिसळून राहणारा.माझा यार....दिसायलाही राजबिंडा.नोकरी चांगली होती.स्वत:चे राहते घर होते....आई बाबांचा लाडका नसला तरी दोडका पण नव्हता.जशी इतर घरात होतात तशी त्यांच्या हि घरात भांडणं व्हायची....शेवटी काय...?दोन पिढ्या एकत्र वावरताना दोनच गोष्टी गरजेच्या असतात....एकतर 'संवाद' नाहीतर 'शांतता'...दोन्ही नसेल तेव्हा फक्त युद्धं होतात....रक्त नाही सांडली तरी भांडी पडतात....त्यांना पोकं येतात....अनिकेतची बायको म्हणजे 'काव्या'...काव्या नावासारखीच होती...कवितेसारखी....रेंगाळणारी....दिसायला नक्षत्र....वागायला नम्र..... नजर लागायची १००% शक्यता होती.....आणि लागलीच....डोळ्यांत खूप स्वप्न घेऊन अनिकेतसोबत एका वर्षापूर्वीच तिने 'थोरातांची सून' म्हणून घरात प्रवेश केला होता.मोठ्या कौतुकाने अनिकेतने बायकोचे नाव 'काव्या' ठेवले होते.तेव्हापासून 'पूजा शिंदे' ची 'काव्या थोरात' झाली होती.माझी काही जास्त ओळख नव्हती तिच्याशी पण बोलून चालून ओळख होती.तिचे प्रेत बाहेर आणले गेले.तिचा चेहरा अजूनही हसरा होता.'सुंदर लोक कोणत्याही क्षणी कोणत्याही वेशात सुंदरच दिसतात' याची खात्री पटली.मागून अनिकेतला आणले गेले.त्याच्या चेहऱ्यावर भाव विचित्र होते.कळत नव्हते...छोटासा का होईना लेखक मी.....पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव मला शब्दात पकडता येत नव्हते.पोलीस आले आणि अनिकेतला घेऊन गेले.....आणि काव्याचा देह सुद्धा....गुन्हा अनिकेतने कबूल केल्याने पोस्ट-मार्टम करण्यास जास्त वेळ लागणार नव्हता....गर्दीची सर्व कारणं गेल्यावर गर्दी करण्यात अर्थ नव्हता....बाकी सगळे गेले...माझी आई अनिकेतच्या आईची समजूत काढत होती...."असा नाही आहे हो आमचा अनिकेत.आम्हाला वाटलं दोघांचा संसार सुरळीत चालू आहे....कुणाची नजर लागली हो..?"बाहेरून अनिकेतच्या आईचे रडणे आणि डोळ्यांसमोर काव्याच्या देहाकडे बघणारा अनिकेत....श्या....जेवण जात नव्हते...झोप हि उडाली होती...."का रे अनिकेत असे का केलेस मित्रा?....मित्रा ???? तुला मित्र म्हणू की नको हा विचार करावासा वाटतोय..इतका नाजूक गळा दाबताना तुला अजिबात कीव नाही आली का रे?...का?? का केलेस?श्या....प्रश्न प्रश्न....आणि प्रश्न.....पण उत्तरं नाहीत....उत्तरं देणारा कुठेय???....हे करून तो खुश असेल का?..हे घडल्यावर ती खुश असेल का? गळा घोटताना तिला किती दुखले असेल...?पण तरीही तिचा चेहरा हसरा कसा होता....?....अनिकेत...अन्या....सांग मला....असे का केलेस?"माणसाला आयुष्यात काय काय हवे असते?...मान्य आहे कि मागितलेले सगळेच मिळत नाही...नाही मिळणारा माणूस रडत राहतो....पण मिळाले कि असे स्वतःच्या कर्माने घालवून बसतो....कधी कधी स्वत:च्या संसाराला स्वतःचीच नजर लागते.....हा 'आरंभ' आहे कि 'शेवट' आहे हें सांगणं कठीण होतं...उद्या जाऊन सकाळी सकाळी अनिकेतला भेटल्याशिवाय मला राहवणार नव्हते.....उद्याच सकाळी अग्नी दिल्यावर त्याला न्यायालयात सादर करणार होते.त्या आधी मला त्याला भेटायचे होते.पोलीस स्टेशनचा इन्स्पेक्टर माझ्या ओळखीचा होता..आमच्या ऑफिसच्या जोश्याचा चुलत भाऊ....म्हणून बोलायला वेळ मिळाला.नाहीतर पाच मिनिटात उरकायला लागणार होते....मी लॉक-अप जवळ गेलो.अनिकेत शांत बसला होता.....गुन्हा केलाय असे वाटतच नव्हते....मला पाहून तो धावत धावत लॉक-अपच्या दाराशी आला....लॉक-अपच्या दाराशी येऊन लोखंडी सळयांमधून अनिकेतने माझा हात धरला....आणि म्हणाला...."संपवलं...संपवलं मी सगळं.बघ आता कुणालाच त्रास नाही.श्री....शांत झालंय बघ सगळं...ती आनंदात आहे बघ आता.""अन्या....अन्या...काय बोलतोयस हे...कोण आनंदात असेल?..वेडा झालायस का?काय करून ठेवलंस हे?..काय बिनसलं होतं रे तुझं?काव्यासारखी बायको मिळायला नशीब लागतं रे मित्रा...गमावून बसलास सगळं..""गमावलं.????कोण बोलतं असं...?मी तिला गमावून....कमावलंय...श्री....'काव्यासारखी बायको मिळायला नशीब लागतं' खरं बोललास.तो नशीबवान मी...पण आंधळा होतो मी...नक्षत्र होती माझी काव्या....हिऱ्यासारखी होती...पण कोंदण चुकलं होतं.इतकं तेज सांभाळायची लायकी नव्हती रे श्री माझी.काय काय भोगलं रे तिने माझ्यासाठी?तिचं हसणं वेड लावणारं होतं...पण मी तिचं वेड होतो...खूप उशिरा कळले मला ते.काल हि भांडून झोपलो मी.जाग आली तेव्हा काव्याही झोपली होती...तिचा ओला गाल पाहिला मी...रडली होती ती...खूप खूप रडली होती...रोजच्या सारखीच...मग बसलो आणि विचार केला....सगळं सगळं उलघडत होतं....मी दोषी ठरत होतो....स्वतःच्याच विचारात स्वतःला दोष आला कि स्वतःच्याच विचारांचा राग येतो...मलाही येत होता स्वतःचाराग..मनाच्या जवळचं माणूस जवळ असलं कि गर्दीची भीती वाटत नाही...पण...तेच माणूस जवळ नसलं कि स्वत:च्या सावलीचीही भीती वाटते.मित्र मला 'बायकोचा बैल' म्हणतील म्हणून कधी गर्दीत कुणासमोर हात नाही धरला मी तिचा.नेहमी एकट सोडलं...तिची नजर शोध्याची मला...पण यातच 'पुरुषार्थ' वाटायचा मला...पुरुषार्थ....मोठा शब्द आहे ना?अर्थ तरी कळतो का रे आपल्याला त्याचा?घरातली बायको हवी तशी राबवता आली म्हणजे पुरुषार्थ मिळतो का?संसार फुलवायला जे लागते ना त्याला म्हणतात 'पुरुषार्थ'.विस्कटता सगळ्यांना येतं.आवरायला हिंमत असावी लागते."अनिकेतच्या डोक्यातली भूतकाळाची पानं पटापट पटापट पलटत होती...मी प्रयत्न करत होतो.पण त्यांच्या पलटण्याचा वेग खूप जास्त होता...माझी घाई होत होती...त्या पानांवरचं सगळं वाचता येत नव्हतं"श्री...'नांदा सौख्यभरे' असा आशीर्वाद घेऊन संसार फुलत नसतो रे.साथीदाराचं सौख्य कळायला मनात डोकवावं लागतं.पण मला कधीच नाही जमलं ते.'वेळ'...खूप मोठी गोष्ट आहे रे श्री....नात्यासाठी....माझ्याकडे वेळ होता....पण तो तिच्यासाठी नव्हता...तो माझ्या मित्रांसाठी होता...मित्रांसोबत दारूच्या बाटल्या फोडून Get Together करताना घरातली सर्वात जवळची मैत्रीण एकटी पडलीय हे विसरलो होतो मी.आपल्या निर्णयात आपल्या जोडीदाराची साथ असली कि हुरूप येतो..पण मी नेहमी ग्राह्य धरलं तिला.पण तिने तोंडातून 'ब्र' नाही काढला श्री....दुनियेला एक शब्द नाही कळला.तिने कळूच नाही दिला.आपण हसलं कि जग फसतं...तिनेही हेच केलं..नेहमी हसऱ्या चेहऱ्याने जगाला फसवलं.स्वतःचा त्रास कधी नाही दाखवला कुणाला?का राहावं तिनं माझ्यासोबत?लायकी तरी आहे का माझी?...कोणत्या विश्वासाने माझ्या हातात तिचा हात दिला होता त्या बापानं?"सांभाळ माझ्या पोरीला" असे म्हणाले होते ते.काय तोंड दाखवू त्यांना आता?मी ओळखतो स्वतःला....दोन दिवस सुधारीन आणि पुन्हा माज चढेल मला...पुन्हा तीच सहन करणार...घटस्फोट दिला तर जग मला सोडून तिलाच दोष देईल...एकच उपाय...मरण...माझं नाही....तिचं...मी आत्महत्या केली तर जग तिलाच टोचून टोचून मारेल.."तशीच ओढणी उचलली मी तिची....तिचीच ओढणी हातात घेऊन तिच्या गळ्याभोवती गुंडाळली.गच्च खेचत गेलो ती.तिच्या ओढणीतून तिचा सुंदर चेहरा चंद्रासारखा दिसत होता.चांदणं पडलं होतं.पण फक्त माझ्यावरच.दोन क्षण वाटले कि, इतका निर्दयी कसा होऊ मी?इतकी नाजूक...इतकी गोड काव्या माझी...नाही...नाही...नाही जमणार हे मला...पण श्री.....पण पुढच्याच क्षणी मला रोज रात्री रडणारी, गालावर सुकेलेलं पाणी घेऊन तशीच झोपनारीकाव्या दिसली.तिच्या मनातलं ऐकू येत होत मला..ती म्हणत होती,"फक्त जेवलं,पाणी पिलं,पोट भरलं इतकीच असते का रे माणसाची भूक?मनाचं काय?त्याला काय हवं असतं रे...दोन सोबतीचे क्षण,जिव्हाळ्याची एक हाक,मायेचा एका स्पर्श....आणि तितकं द्यायला हि आपल्या माणसांकडे वेळ नसावा.असण्याला 'असणं' कसं म्हणावं?इथे शांती मागितली कि एकांत मिळतो...एकांतात आणि अंतात फक्त एकाचाच फरक...आम्ही जगासाठी दोन नसून 'एक' आहोत...आम्ही खरंच 'एक' आहोत...पण आमचा 'एक' आणि जगाचा 'एक' वेगळा आहे.आम्ही एक-एकटे आहोत."गळा आवळला ना तसा तिला थोडा त्रास झाला.पण माझ्या डोळ्यांत पाणी होतं तिच्यासाठी.प्रेम होतं तिच्यासाठी.तिने ते पाहिलं माझ्या डोळ्यांत आणि गोड हसली.हसतच राहिली.माझा हात गच्च होत होता.ओढणी ताणली जात होती आणि ती सुंदर हसत होती....तिच्या प्रत्येक हसऱ्या क्षणासोबत माझा हुंदका वाढत होता....मी आजवर काय काय त्रास दिला,किती छळलं हे आठवत होतं...नाही...नाही....या पुढे नाही द्यायचा त्रास....माणूस आहे रे ती...सहन तरी किती करावं?...ओढणी ताणली...गळयाजवळचा माझा धरलेला हात तिने घट्ट केला.खूप ओढ होती रे त्या स्पर्शात...पण मी म्हणालो तिला,"नको लावूस इतकी ओढ...मी नाहीयेय या ओढीच्या लायकीचा..तू छान आहेस काव्या.चुकलो मी माफ कर मला."गोड हसली रे ती....पुढच्या क्षणी बोटं तिची सैल पडली.डोळे झाकले तिने सुखाने.पण चेहऱ्यावर तेच हास्य होतं...

ओळख प्रेमाची ( एक प्रेमकथा )


समर हा असा मुलगा आहे ज्याने कधीही प्रेमावर विश्वास नाही ठेवला.आणि याच गोष्टीवरुन त्याचे त्याच्या मित्रांशी नेहमी वाद व्हायचे.तो इतका कॉन्फीडंट होता की आपण या जगातल्या कोणत्याही मुलीचं हृदय परीवर्तन (शुद्ध भराठी भाषेत याला "पोरगी पटवणे"असं म्हणतात) करु शकतो,असं त्याला वाटायचं. या जगात प्रेम नावाची कसलीही गोष्ट नसुन फक्त वासनाच आहे असं त्याचं म्हणणं होतं.
एक दिवस त्याच्या मित्रांनी त्याच्याशी पैज लावली की जर तु योगिता आणि जय या प्रेमवीरांना वेगळं करुन दाखवलंस तर तुझी गोष्ट आम्ही सर्वार्थाने मान्य करु.त्याने पैज स्वीकारली. समर हा खरातर खुपच हुशार मुलगा आहे.मुली पटवण्याची त्याची आपली एक वेगळीच स्टाईल आहे.आणि खरंच त्या स्टाईलवर एक दिवस योगिता घसरली.ओळख
झाली,चांगली मैत्री ही झाली.पण एक दिवस खरंच जेव्हा ठरल्याप्रमाणे प्रेमातील नाटकाचा एक भाग म्हणुन समरने तिला I LOVE YOU म्हटलं.तेव्हा त्याचं उत्तर देण्याआधी तिने जयबरोबर केलेल्या breakup बद्दल सगळं सांगितलं.
त्याने त्यावर काहीही आक्षेप घेतला नाही.मग त्याने तिला त्याच्या या कारणासहीत तिला स्वीकारण्याचं नाटक केलं.आणि एका कच्च्या पायावर
उभ्या असलेल्या रिलेशनशिपमध्ये ते राहु लागले. एकमेकांसोबत ते वेळ घालवु लागले.आणि याचीच जाणीव त्याने मित्रांना करुन दिली.
मित्रांनाही त्याची बाजु मान्य करावीच लागली.त्यानंतर त्याने अधिकृतरित्या तिच्याशी breakup केला.ती खुपच दुःखावली गेली कारण breakup चं योग्य कारणच तिला कळलं नव्हतं.पण समरला ही परिस्थिती काही नवीन नव्हती. त्याने असे कित्येक breakups याआधीही केले होते.पण आता येणारी परिस्थिती त्याच्यासाठी नवीन होती.
तिला तिचा गोड आवाज सारखासारखा आठवु लागला.तिचा चेहरा समोर
दिसायचा.वार्याची झुळुक तिचा सुगंध घेऊन यायची.पाण्याच्या स्पर्शात
त्याला तिची जाणीव व्हायची.पुन्हाप ुन्हा आरशासमोर जाऊन उभं राहायचा.काय होतंय हे कळतंच नव्हतं.
आणि एक दिवस स्वप्नात योगिता आली.खुपच दुःखी होती ती.breakup
मुळे ती आत्महत्या करायला चालली होती.ती दहा मजली ईमारतीवरुन
उडी मारुन जीव देणार तेवढ्यात त्याला जाग आली.समोर त्याची धाकटी बहीण दिशा त्याच्यासाठी bed tea घेऊन आली होती.
ती म्हणाली,.gd moning दादा.हा घे चहा। त्याने चहा घेतला. योगिताबरोबर तु असं करायला नको होतंस दादा। तुला कसं कळलं योगिताबद्दल?तु पुन्हा माझी डायरी पुन्हा वाचलीस.थांब तुला मी आता बघतोच....
दिशाःsorry sorry मी पुन्हा नाही असं करणार. समरःok.(थोडा विचार करुन)खरंच मी चुकलो का गं? दिशाःहोय खुपच..जेव्हा एखादी मुलगी एखाद्या मुलावर प्रेम करते तेव्हा ती त्यालाच सर्वस्व मानते.आणि तु
तर तिचा विश्वास तोडुन तिचं सर्वस्वच हिरावुन घेतलंस.तुला एक सांगते जय नावाचा जो मुलगा आहे ना त्याने स्वतःच्या गळ्याला चाकु लावुन योगिताचा होकार मिळवला होता.म्हणुन ते नातं एक ना एक दिवस तुटणारच होतं फक्त याला कारणीभुत तु ठरलास ....
समरःखरंच.आणि मीही खुपच चुकीचं वागलो.मी खुपच practically वागायचो.मला माहीती नव्हतं की प्रेम ही practically नाही heartly करण्याची गोष्ट आहे.तुला मी एक खरं सांगु का मी खरंच योगिताच्या प्रेमात पडलोय गं.
दिशाःअरे मग जाउन सांग ना तिला. समरःपण ती मला माफ करेल? दिशाः तिचं तुझ्यावर खरं प्रेम आहे ना?मग नक्की माफ करेल दिशाचं ऐकुन त्याने योगिताची शोधाशोध सुरु केली.ती तिच्या आजीकडे गेलीय,हे
समरला कळलं.तिच्या प्रेमाची एक परीक्षा म्हणुन तो एका नवीन रुपात तिच्यासमोर प्रेझेँट झाला पण थोडाही वेळ न लावता तिने त्याला ओळखलं.त्याला पाहुन तिला प्रचंड आनंद झाला.त्याने तिची मनापासुन
माफी मागितली.आणि आपल्या मनातलं खरं प्रेम त्याने व्यक्त केलं.
योगितानेही वेळ न दवडता त्याला मोठ्या मनाने माफ केलं.आणि तिने समरला आहे तसं स्वीकारलं.
मित्रांनो ही होती समरची प्रेमकथा,पण प्रत्येकाच्या प्रेमाचा शेवट असा गोड होईलच असा नाही.हा पण जरा समझदारीने निर्णय घेतला तर जवळजवळ प्रत्येक lovestory चा शेवट हा गोडच होईल.

खेडेगावातला तो तर शहरातली ती...


फ्रेंड लिस्ट मध्ये बरेच असतात ऑनलाईन, पण कोणाशीच बोलायची इच्छा नसते, बर्याच नवनवीन पोस्ट असतात पण नाही वाटत त्या वाचाव्या, कमेंट करावी.. होत अस कधी कधी ... कारण, वाटत असत ... फक्त आणि फक्त तिने किंवा त्याने रिप्लाय द्यावा. त्या एकाच व्यक्तीशी बोलायचं असत. खूप काही सांगायचं असत आणि बरच काही ऐकायचं असत. नेहमीच एका सारख्याच (विशिष्ट) वेळेला तीच ऑन लाईन येण हे माहित झालेलं असत त्याला, मग धडपड करून त्याच त्या वेळेला हजर होण आणि मग गप्पांच रंगत जाण... पाहिलेलं नसत दोघांनीही एकमेकांना पण तरीही विचारांचं जुळण जमलेलं असत. साधेसेच दररोजच्या आयुष्यातले तर विषय असायचे, कशाचाच कशाला ताळमेळ नाही.. त्याच शेतातल वार्यावर डोलणाऱ्या पिकाच केलेलं वर्णन तिला आवडायचं तर तीच गर्दीत एकमेकांना ढकलत ट्रेनला "क्याच" करण त्याला कौतुकास्पद वाटायचं. खेडेगावातला तो तर शहरातली ती.. तो डोंगराचे, नदीचे, पाटातल्या पाण्याचे फोटो तिला पाठवायचा तर ती रस्त्यावरच्या ट्राफिकचे, उंच इमारतींचे, फेसाळणार्या समुद्राचे फोटो त्याला पाठवायची. तो तिच्या नजरेतून शहर पाहायचा तर ती त्याच्या नजरेतून गाव अनुभवायची.मस्त गट्टी जमलेली त्यांची. "आज धो धो पाऊस कोसळतोय इथे.. मी जातोय भिजायला... सॉरी... आज गप्पांना सुट्टी " हा त्याचा मेसेज आला कि ती लॉग ओउट करायची तर " आज भन्नाट काम आहे... तुझ्याशी बोलत राहिले तर नाईट शिफ्ट करावी लागेल.. बोलू नंतर " हा तिचा मेसेज वाचला कि तो ऑफ लाईन व्हायचा. ना कधी राग न कधी कडवटपणा. काहीही असो.. दोघ समजून घ्यायचे एकमेकांना.पण आयुष्य म्हटल्यावर ते सरळ मार्गी नसणारच; नागमोडी, धोक्याची वळण नसतील तर ते आयुष्य कसलं. त्या दोघांचेही प्रश्न होतेच आणि तेही गाव आणि शहरातल्या समस्यानसारखेच.. एकदम वेगळे. खरतर भिन्न टोकांचे. तिने ज्यांचा कधी विचारच केला नव्हता तर त्याने हाही प्रश्न होऊ शकतो ? अशी काहीतरी भावना दर्शवलेली. तो पाणी नाही म्हणून पाण्याच्या ATM मधून, दूरवर जाऊन पाणी आणायचा अन वैतागायचा तर ती ब्यान्केच ATM नीट काम करत नाही म्हणून ब्यांकेत जाऊन गोंधळ घालून यायची. २४ तास घरात पाणी असणार्या तिला पाण्याच ATM माहित नव्हत तर काही किलोमीटर दूर असणार्या ब्यांकेत जाऊन धुमाकुळ घालता येतो हे त्याला पटतच नव्हत. घरात, शेजारी, मित्र मैत्रीण यांसोबत दोघांच बर्याचदा बिनसायच मग त्याचा परिणाम त्यांच्या बोलण्यावर व्हायचा पण भांडण नाही.. फक्त एकमेकांना समजावण, कधी कधी चर्चा करण.. कधी मत जुळायची कधी मतभेद व्हायचे. पणअबोला यायचं कारण नव्हतच कधी. त्या दोघांनीही बाजू एकदम सुरळीत सावरली होती. कधी स्वतःची तर कधीसमोरच्याची.कधी काळी एकमेकांना अनोळखी असलेले ते दोघ, आता स्वतःपेक्षा जास्त ओळखायला लागलेले असतात एकमेकांना. महिने जातात. त्यांचं अनोळखी नात घनिष्ठ होत जात. मैत्रीच्या थोड पलीकडे आणि प्रेमाच्या थोडस अलीकडे .. मग एक दिवस ती सांगते, "माझ लग्न ठरतंय.पहिलच स्थळ.एकदम जुळल…अचानकच” तो थोडावेळ शांत; मग उत्तरतो , "अभिनंदन, नवर्याला जास्त सतवू नकोस.." ती गप्पबसते.. तो हि काही बोलत नाही.. काही दिवस जातात मग आठवडे. संवाद थांबतो. अडखडत बोलण वाढत. एकमेकांशी बोलण्याची लागलेली सवय कि व्यसन तेही कमी होत जात. भावनांचा वाढलेला गोंधळ लक्षात आलेला असतो दोघांच्या पण त्यावर पर्याय नसतो किंवा जो होता तो मान्य नसतो. ती हि आता भावी नवर्याबरोबर स्वप्न रंगवण्यात गुंतलेली असते. तो हि कामात स्वतःला गुरफटवून घेतो. महिने जातात.मग एक दिवस ती त्याला लग्नाच्या पत्रिकेचा फोटो पाठवते पण सोबत एक मेसेज देखील.. "पाहिलं प्रेमविसरता येत नाही म्हणतात, तुलाही नाही विसरू शकणार मी..." नकळत मनातल, अस्पष्टपणे सांगितलं जात. त्याचाही दोन दिवसांनी रिप्लाय येतो.."मी आर्मी जॉईन करतोय . तुझ्यावरच प्रेम व्यक्त नाहीकरू शकलो पण मातृभूमिवरच प्रेम सिद्ध करतोय. तुही नेहमीच असशील माझ्या आठवणीत. तूच पहिलं आणि तूच शेवटच प्रेम. काळजी घे. आनंदात राहा. मी नसेन तरीही असेन आठवतंय आपल आवडत वाक्य... "हसतानाबरेच जण येतात सोबत द्यायला...पण रडताना कोणाची सोबत असेल तर बात बन जाये ... " फक्त आठवणी पुरेशा आहेत ग... अलविदा"ती बोहल्यावर चढली नि तो आर्मीत ड्युटीवर रुजू झाला. तिने लग्नाचा शालू नेसला आणि त्याने वर्दी चढवली. तिचा संसार सुरु झाला अन त्याची लढाई. शहीद झाला तेव्हा मुखात वन्दे मातरम सोबत तीच नाव होत. तिनेही वर्तमानपत्रात त्याची बातमी वाचली. रडत राहिली बराच वेळ.. पण आजही जेव्हा तिला खूप खूप रडायचं असत तेव्हा ती त्याच्याशीच बोलते... रात्रीच्या चांदण्यात त्याला शोधत हितगुज साधते.आजही “तो” तिच्यासोबत आहे आणि राहील...